दलित पॅन्थर
मित्रवर्य सुरेश सावंत याचा लेख, जरूर वाचावा👇 || *पँथर, मी आणि पुढे…* - सुरेश सावंत ___________ दलित पँथरचा १९७२ साली जन्म झाला त्यावेळी मी ७ वर्षांचा होतो. ७४ ला ती फुटली त्यावेळी ९ वर्षांचा आणि ७७ ला बरखास्त झाली त्यावेळी १२ वर्षांचा. मूळ पँथरचे एकूण आयुष्य पाच वर्षांचे. त्यातील भराचा काळ तसा अडीच-तीन वर्षांचाच. बाकी बरखास्तीपर्यंत आंदोलने होत राहिली तरी तो काळ मुख्यतः नेत्यांच्या वादावादीने व्यापलेला. ९ ते १२ वर्षे या वयातला मी आणि याच वयोगटातले माझे सवंगडी पँथरचे कार्यकर्ते असण्याचा प्रश्न नव्हता. मात्र धुमसणाऱ्या भोवतालातून येणाऱ्या संवेदना-जाणीवांनी आम्ही अंतर्बाह्य सुलाखून निघत होतो. मोर्चे, घोषणा, सभा, दगडफेक, पोलिसांशी झटापटी, तरुणांचे गल्ल्यांतून धावणे, पसार होणे, लपणे, त्यांच्या अंगावरील जखमा, रस्त्यावरील दगड-काचांचा खच आम्ही बघत होतो. नकळत त्यातील घटक होत होतो. घोषणा देत होतो, दगड फेकत होतो, पळत होतो. सकाळी सार्वजनिक शौचालयात रांग लावलेल्यांच्या चर्चा आणि संध्याकाळी-रात्री गल्लीच्या कोपऱ्यावर रंगणाऱ्या गप्पा यातून चळवळीच्या बऱ्याच आतल्या गोष्टी कळत. आपल्या लोकांवर अन्य...