● ️महामानव : डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर (भाग : ५०) लेखक : डॉ. ज्ञानराज गायकवाड

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  ● ️महामानव : डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर
                         (भाग : ५०)
          लेखक : डॉ. ज्ञानराज गायकवाड 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                         तृतीय खंड :
   कर्तबगार मंत्री, राज्य घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार,
                जागृत राज्य सभा सदस्य
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                         प्रकरण : २२
        सतत राष्ट्रहित चिंतणारे थोर राष्ट्रभक्त
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

            स्वाभिमानी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी कायदा खात्याच्या मंत्री पदाला चिकटून राहण्याचा मोह आपल्या मनात येऊ दिला नाही. म्हणूनच त्यांनी अगदी बाणेदारपणे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एक लेखी निवेदन पत्रकारांना प्रसिद्धीसाठी दिले. त्या लेखी निवेदनात स्वतंत्र भारत सरकारच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या परराष्ट्र नीतीचा अर्थात परराष्ट्र विषयक धोरणाचा उल्लेख, अतिशय महत्त्वाचा आहे. डॉ. आंबेडकर नेहमी देश हिताला प्राधान्य देत होते. देश हिताला प्राधान्य देण्याच्या आपल्या स्वभावानुसार डॉ. आंबेडकर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा जागरूक व दूरदर्शी रक्षक होते. ते अस्पृश्यांचा महान नेता होतेच. पण त्याबरोबरच ते राष्ट्राचे ही हित चिंतणारा महान राजनेता होते.

अस्पृश्यांचा उद्धार करणे हे तर त्यांचे जीवितकार्यच होते. ते अस्पृश्यांच्या उद्धारात अखिल हिंदू समाजाचा उद्धार पाहत होते आणि आपल्या देशाचाही उद्धार पाहत होते. म्हणून तर त्यांच्या मनात अस्पृश्यांच्या उद्धाराबरोबरच अखिल हिंदू समाजाच्या उद्धाराचे व आपल्या देशाच्या उद्धाराचे विचार येत होते. अस्पृश्योद्धार हे त्यांचे आद्य कर्तव्य होते आणि हिंदू समाजाचा उद्धार व आपल्या देशाचा उद्धार तत्संबंधी कर्तव्य होते. त्यांना पुढील वस्तुस्थिती तीव्रतेने जाणवली होती. हिंदू समाज उच्च - नीचता आणि विषमता या दोन आधारांवर अनेक जातींमध्ये विभागलेला आहे. सर्वात वरची जात सर्वाधिक मानाची. त्यानंतर एक एक खालची जात कमी कमी मानाची.ज्ञान आणि तत्संबंधी साधने सर्वांत वरच्या जातीच्या अधिकारात आहेत. ज्ञान, सत्ता व संपत्ती यांवर सर्वांत वरच्या जातीचा आणि आणखी काही वरच्या जातींच्या संगनमताचा एकाधिकार आहे. अशा वरच्या जातींच्या औदार्यावर खालच्या जातींचे जीवन अवलंबून आहे. पराधीन आहे. उच्च - नीचता निष्ठ विषमता आणि खालच्या खालच्या जातींची पराधीनता ही हिंदू समाजाची भयानक वास्तविकता आहे. हिंदू समाजाची दुसरी भयानक वास्तविकता ही आहे की, हिंदू समाज स्पृश्य वर्ग आणि अस्पृश्य वर्ग अशा दोन वर्गांत विभागलेला आहे. स्पृश्य वर्ग दलनशील वर्ग आहे आणि अस्पृश्य वर्ग दलित वर्ग आहे. 

स्पृश्य वर्गात येणाऱ्या वरच्या जातींना आपापसात स्पर्श चालतो. पण त्यांना अस्पृश्य वर्गात येणाऱ्या खालच्या जातींचा स्पर्श चालत नाही. म्हणून स्पृश्य वर्ग अस्पृश्य वर्गाबरोबर अस्पृश्यता पाळतो, त्याला ज्ञान, सत्ता व संपत्ती यांच्या अधिकारापासून वंचित ठेवतो आणि त्याच्यावर अन्याय - अत्याचार करून त्याच्याकडून वाट्टेल ती कामे कमी मोबदल्यात किंवा विना मोबदल्यात करून घेतो. त्याला आपल्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पाणी भरू देत नाही आणि त्याला मंदिरातही येऊ देत नाही. अशा अस्पृश्य वर्गात येणाऱ्या महार जातीत डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहानपणापासूनच महार जातीची आणि एकूणच अस्पृश्य वर्गाची दयनीय दलित दशा अनुभवली होती. म्हणूनच डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रातील उच्च उच्च पदव्या मिळवीत. ज्ञान संपन्न झाल्यानंतर महार जातीचा आणि एकूणच अस्पृश्य वर्गाचा उद्धार करण्याची पवित्र प्रतिज्ञा केली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी अस्पृश्योद्धाराच्या आणि अस्पृश्यतेच्या उच्चाटनाच्या कार्याला आपले जीवित कार्य म्हणून मान्यता दिली होती. अस्पृश्यांना ही मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आणि पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता यावे. म्हणून डॉ. आंबेडकर यांनी आपल्या जीवित कार्याचा आरंभ सत्याग्रहापासून केला. 

त्यावेळी त्यांना जाणीव होती की, हिंदुस्थानवर (भारतावर) ब्रिटिशांचे राज्य आहे आणि पारतंत्र्यातील हिंदुस्थानला (भारताला) स्वतंत्र करण्यासाठी गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला आहे. पण डॉ. आंबेडकर यांना हिंदू समाजाच्या स्पृश्य वर्गाने लादलेल्या अस्पृश्यतेपासून, जातिभेदापासून, विषमतेपासून, दारिद्र्यापासून आणि अन्याय अत्याचारापासून अस्पृश्य वर्गाला मुक्त करावयाचे होते आणि त्यासाठी त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यता जातिभेद आणि विषमता या तीन शत्रूच्या विरुद्ध मुक्तीचा संघर्ष सुरू केला होता. त्यांना हिंदू समाजाला या तीन शत्रूपासून मुक्त करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन जीवन मूल्यांवर आधारून संपूर्ण हिंदू समाजाचे पुनः संघटन करावयाचे होते. यावरून हेच सिद्ध होत होते की, डॉ. आंबेडकर अस्पृश्योद्धाराच्या आपल्या जीवित कार्याच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाजाचा उद्धार करू इच्छित होते. कारण विघटित हिंदू समाज जर सर्व भेदांपासून मुक्त होऊन एकतेच्या आधारावर संघटित झाला. तर हिंदू समाज बलशाली बनून ब्रिटिशांच्या म्हणजेच परकीयांच्या सत्तेपासून स्वतंत्र ही होऊ शकेल आणि कायम स्वरूपी स्वतंत्रच राहू शकेल. 

डॉ. आंबेडकरांचे अस्पृश्योद्धाराचे जीवित कार्य पर्यायाने हिंदू समाजाच्या उद्धाराशी निगडित होते आणि पर्यायाने हिंदुस्थान (भारत) या आपल्या देशाच्या उद्धाराशी निगडित होते. डॉ. आंबेडकरांची क्रांतिकारी, दूरदर्शी आणि विशाल दृष्टी एका अर्थाने अस्पृश्यांच्या उद्धारावर केंद्रित झाली होती. दुसऱ्या अर्थाने हिंदू समाजाच्या उद्धारावर केंद्रित झाली होती आणि तिसऱ्या अर्थाने हिंदुस्थान (भारत) या आपल्या देशाच्या उद्धारावर केंद्रित झाली होती सामाजिक नेता, राजकीय नेता आणि राष्ट्रीय नेता म्हणून डॉ. आंबेडकरांचे जीवित कार्य त्रिविध असणे. हे त्यांचे वैशिष्ट्य दुर्मिळ, विलक्षण आणि व्यापक होते. अशा प्रकारचे वैशिष्ट्य असलेला त्या काळातील एकमेव नेता म्हणजे डॉ. बी. आर. आंबेडकर होते. 

पहिल्या गोलमेज परिषदेत आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या सामाजिक व राजकीय हितासाठी युक्तिवाद करून ब्रिटिश सरकार कडून अस्पृश्यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची सोय मिळविली. त्या सोयीमुळे अस्पृश्य उमेदवार अस्पृश्य मतदारांच्याच मतांवर निवडून येऊ शकत होता. त्यासाठी त्याला स्पृश्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नव्हती. परंतु ही सोय रद्द करण्यात यावी आणि अस्पृश्य उमेदवाराला ही स्पृश्यांच्या मतांवर अवलंबून राहून संयुक्त मतदार संघाच्या सोयीतून निवडणूक लढविण्याचे मान्य करण्यात यावे. म्हणून गांधीनी आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण सुरू केले. उपोषणामुळे गांधींची प्रकृती खालावत चालली होती. त्या वेळी डॉ. आंबेडकरांनी हिंदुस्थान या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती गांधीजींना वाचविले पाहिजे. असा देश हिताचा विचार केला आणि पुणे करारावर सही करून गांधींचे प्राण वाचविले. त्यांनी देश हिताला प्राधान्य दिले आणि गांधींचे प्राण वाचवून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला फार मोठे सहकार्य केले. त्यांचा देश हिताचा म्हणजेच राष्ट्र हिताचा विचार नेहमीच प्रखर होता. त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या जीवित कार्याची अंतिम परिणती देश हितात म्हणजेच राष्ट्र हितात होत होती. म्हणूनच ते नेहमी आपल्या भाषणातून आपला देश हिताचा प्रखर विचार मोठ्या आवेशाने, गांभीर्याने आणि सडेतोडपणे व्यक्त करीत होते. या बाबतीत ते कोणाची ही पर्वा करीत नव्हते. 

१७ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या बैठकीत नेहरूंच्या ठरावावर देश भक्तीने परिपूर्ण भाषण करताना सर्वांच्या हितासाठी अखंड हिंदुस्थानचे (भारताचे) जोरदार समर्थन केले आणि हिंदुस्थानची (भारताची) फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करू पाहणाऱ्या मुस्लिमांना उद्देशून ते म्हणाले की, एखाद्या दिवशी तेही विचार करतील की, संयुक्त हिंदुस्थानच (भारतच) म्हणजे अखंड हिंदुस्थानच (भारतच) त्यांच्यासाठी ही अधिक चांगला आहे. They Too Will Begin To Think That या United India Is Better For Them. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत राज्य घटनेशी संबंधित अखेरचे भाषण करताना घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या मनात येणारा पाहिला महत्त्वाचा विचार भाषणाच्या सुरुवातीलाच सोगितला. “२६ जानेवारी १९५० रोजी भारत (देश खऱ्या अर्थाने) स्वतंत्र देश होईल. (जयघोष) (पण) त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की, तो पुन्हा (आपले स्वातंत्र्य) गमावून बसेल? माझ्या मनात येणारा हा पहिला विचार आहे."

स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याची काळजी करणारे आणि स्वतंत्र भारताचा राज्य कारभार लोक हितार्थ सुत्सवस्थित घालण्यासाठी घटनाकार म्हणून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करणारे डॉ. आंबेडकर एक थोर देशभक्त म्हणजेच एक महान राष्ट्रभक्त म्हणून स्वतंत्र भारताच्या हिताविषयी अत्यंत जागरूकतेने आणि दूरदर्शीपणाने काळजी व विचार करीत होते. हे तर आपले आय कर्तव्य आहे असेचते समजत होते. आपल्या थोर देश भक्तीनुसार म्हणजेच महान राष्ट्र भक्तीनुसार डॉ. आंबेडकर यांनी कायदा खात्याच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्या विषयीच्या आपल्या निवेदनात आपल्या राजीनाम्याचे तिसरे कारण म्हणून स्वतंत्र भारत सरकारच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या चुकीचमा परराष्ट्र नीतीचा म्हणजेच परराष्ट्र विषयक चुकीच्या घोरणाचा अगदी समर्पक, उल्लेख केला होता. एक तर स्वतंत्र भारताने आणखी काही काळ युद्ध चालू ठेवले असते तर पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला कश्मीरचा प्रदेश आपणाला आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळाले असते आणि कश्मीर वरून भारत आणि पाकिस्तान मध्ये सुरू झालेले युद्ध कायमचे मिटले असते. असे जर झाले असते तर भारताला आपल्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च केवळ सैन्यासाठी खर्च करण्याची गरज पडली नसती आणि अन्य विकासाच्या कामांसाठी पैसा शिल्लक राहिला असता. 

दुसरे असे की, पाकिस्तानच्या ताब्यातला कश्मीरचा प्रदेश सोडवून घेण्यासाठी स्वतंत्र भारताने युनोकडे कश्मीरचा प्रश्न नेण्यात दुसरी भयंकर चूक केली। युनोमध्ये सार्वमताचा आधार घेण्याचा विषय निघाल्यामुळे कश्मीरचा प्रश्न जास्तच गुंतागुंतीचा झाला. कश्मीर मध्ये सार्वमत घेऊन कश्मीरने भारताबरोबर राहवयाचे की पाकिस्तान बरोबर हे निश्चित करण्यात यावे. असे युनोमध्ये सुचविण्यात आले. ही सूचना भारताला मुळीच न्याय देणारी आणि फायदा देणारी नव्हती. उलट जम्मू आणि लडाख मध्ये जी हिंदू व बौद्ध जनता आहे. तिच्यावर फारच अन्याय करणारी होती. म्हणून डॉ. आंबेडकर यांनी एक समर्पक उपाय सुचविला की, युद्धबंदी भाग, काश्मीर खोरे आणि जम्मू - लडाख असे कश्मीरचे तीन भाग करावेत आणि मग प्रत्येक भागात सातमात घ्यावे. असे केल्याने हिंदूंची व बौद्धांची संख्या जास्त असलेला जम्मू - लडाख हा भाग भारताचा भाग होईल आणि मुस्लिमांची संख्या जास्त असलेले काश्मीर खोरे आणि युद्धबंदी भाग पाकिस्तानचे भाग होतील. या व्यवहार्य उपायामुळे काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारत व पाकिस्तान भांडण कायमचे मिटेल. त्यामुळे भारताला प्रत्येक वर्षी सैन्यासाठी जास्तीत जास्त पैसाख करीत राहाण्याची गरजच राहणार नाही. परंतु दुदैवाने डॉ. आंबेडकर यांचा सल्ला ऐकूण तरी घ्यावा. त्यासाठी स्वतंत्र भारताच्या काँग्रेस सरकारची थोडी सुद्धा तयारी नव्हती. 

युनो कमी तरी आपणाला न्याय देईल. अशा भाबड्या समजुतीत राहून भारत चढाईखोर पाकिस्तान विषयीच्या साशंकतेमुळे सैन्यासाठी जास्तीत जास्त खर्च करीतच असतो. युनोने कश्मीरचा प्रश्न सोडवलातर नाहीच.-उलट सार्वमताच्या खोड्यात भारताला अडकवून कश्मीरक्षा प्रश्न कायम स्वरूपी लटकवत ठेवला. है एक भारताचे नुकसान झाले आणि भारताचे दुसरे भयंकर नुकसान असे झाले की, पाकिस्तान युनोमध्ये भारतच चढाईखोर व युद्धखोर राष्ट्र आहे. असा कांगावा करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे युनोशी संबंधित अनेक राष्ट्र भारताकडे संशयाच्या नजरेने पाहू लागली. अशी राष्ट्र भारतापासून फटकून राहू लागली आणि पाकिस्तानकडे झुकू लागली. त्यांना भारताच्या हिताची बाजू घेणे नकोसे वाटत होते. अशी राष्ट्र भारताशी मैत्री कशी काय करणार? कांगाळखोर पाकिस्तानने युनोच्या माध्यमातून भारताला अगदी एकाकी पाडले होते. म्हणून डॉ. आंबेडकर आपल्या राजीनाम्याच्या निवेदनात म्हणाले. "१५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपले बाईट इच्छिणारा एकही देश नव्हता. जगातला प्रत्येक देश आपला मित्र होता. पण चार वर्षानतर आज आपले सर्व मित्र आपणाला सोडून गेले आहेत." सरकारच्या परराष्ट्र विषयक चुकीच्या धोरणामुळे स्वतंत्र भारताचे किती भयानक नुकसान होत होते. ते पाहून थोर देशभक्त डॉ. आंबेडकर यांचे बेचैन होणे स्वाभाविक होते.

◆◆◆◆◆◆◆●◆◆
प्रकरण ५० : समाप्त
◆◆◆◆◆◆◆◆●◆

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• दि बुद्धिस्ट हेल्प बोर्ड ऑफ इंडिया
https://www.facebook.com/groups/1879190012248696/?ref=share

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सादर कोणत्या ही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

सादर कोणत्या ही समस्यावर उपाय - योजना किंवा आपल्याला लागणारी माहिती, पुस्तके, सर्व प्रकारचे साहित्य किंवा आपणास हवी असेल. तशी मदत कर्ली जाईल. तसेच आपणास The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास दिलेल्या (हेल्पलाईन क्रमांक : ७७१८९६२४०६) या हेल्पलाईन क्रमांकावर मेसेजने संपर्क करा.

◆ BSNET NEW & OLD HELPLINE 
     7718962406 or 9967065953
(Use Only One WhatsApp Number)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           राजू साबळे : ९८२३३८९५२५     
          रमेश भोसले : ९७७३३३८१४४     
      कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  
         क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule