तुकाराम बाबा जत तालुक्यातील १५ हजार कुटूंबियांना देणार भाजीपाला
PSKNEWS NETWORK
संख प्रतिनिधी/ मिलींद टोणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी जत तालुक्यातील गोरगरीब जनतेला मास्क, सॅनिटायझर, जिवणावश्यक किट बरोबरच घरपोच भाजीपाला देण्याचा अभिनव उपक्रम चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी सुरू केला आहे. तालुक्यातील पंधरा हजार कुटूंबियांना भाजीपाला देण्याचे नियोजन तुकाराम बाबा महाराज यांनी केले असून दररोज पाच टन भाजीपाल्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात, राज्यात लॉक डाऊन जाहीर केला. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वात प्रथम चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी पुढाकार घेत साडेसात हजाराच्या आसपास मास्कचे वाटप केले.
पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यापर्यत थेट कार्यालयात जावून तुकाराम बाबा महाराज यांनी मास्कचे वाटप केले.
मास्क वाटप करताना समाजातील गोरगरीब जनता उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत शक्य आहे तेवढयांना गहू, तांदूळ, तेल व अन्य किराणा माल असलेले जिवणावश्यक किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील दोन हजार एकशे एक कुटूंबियांना जिवनावश्यक किटचे वाटप केले. आजही गरज असेल तेथे तुकाराम बाबा महाराज हे जिवनावश्यक किटचे वाटप करत आहेत.
जिवनावश्यक किटच्या वायपानंतर तुकाराम बाबा महाराज यांनी थेट घरपोच भाजीपाला देण्याचा मानस व्यक्त करत भाजीपाला वाटप सुरू केले आहे. तालुक्यातील जाडरबोबलाद, सोन्याळ येथे सोमवारी गोरगरिबांच्या घरी जावून त्यांना मिरची, टमाटो आदी भाज्याचे वाटप केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले की, तालुक्यातील पंधरा हजार कुटूंबियांना भाजीपाला वाटपाचे नियोजन आखले आहे. दररोज पाच टन भाजीपाला तालुक्यातील विविध गावात वाटप करण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे दूध, पेपर घरपोच मिळते त्याचप्रमाणे भाजीपालाही घरपोच देऊ. जनतेने बाहेर न पडता घरात रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
जत तालुक्यात प्रथमच तुकाराम बाबा महाराज यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाटपाचे नियोजन आखले आहे. भाजीपाला घरपोच मिळत असल्याने अनेकांनी तुकाराम बाबा महाराज यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांनाही दिला बाबांनी दिलासा
लॉक डाऊनमुळे भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. भाजीपाला टाकून देण्याची वेळ आली आहे. मजूर लावून भाजीपाला काढणे ही परवडणारे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले भाजीचे प्लॉट आहे तसेच सोडून दिले.याबाबत तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली व त्यांची भेट घेत त्यांना फुल नाही फुलांची पाकळीची मदत करत त्यांचा भाजीपाला थेट बांधावरून खरेदी केला. अनेक शेतकऱ्यांना तुकाराम बाबांची ही संकल्पना पडल्याने त्यांनी एक रुपयाही न घेता भाजीपाला देत त्यांच्या या अभिनव उपक्रमाला हातभार लावला.
---------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा