महावितरण कर्मचाऱ्यांच्या जीवाचे मोल सफाई कामगारांपेक्षा कमी ?
जत/प्रतिनिधी:
कोरोनाच्या या महामारी रोगामध्ये सर्वच आपल्या परीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. प्रत्येकाची जबाबदारी पार पाडत असताना डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, बस विभाग या सर्वाना शासनाने 50 लाखाचा विमा जाहीर केला. मात्र फक्त महावितरण मधील कामगारांना 30 लाख रुपये मंजूर केले. म्हणजे महावितरण मध्ये काम करणे स्वस्त आहे का ? असा सवाल सुनील माने यांनी केला आहे.
वीज कामगारांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या 20 लाख रुपये चा तोटा कुणाला विचारायचा. अशी तफावत का हे शासनाने जाहीर करावे. त्याच रोगाने इतर विभागाचे कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबाला 50 लाख आणि महावितरण मध्ये त्याच रोगाने मृत्यू पावल्यास 30 लाख म्हणजे जीवाचे मोल वेगवेगळे कसे ? एवढ्या संघटना, एवढे राजकीय पक्ष असून तेही का गप्प याचे गुपित समजलेच नाही.
लॉक डाउन काळात सर्वच विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाचे रान करून आपले कर्तव्य पार पाडत होते, परंतु work from home आणि सर्व नागरिकांना घरात बसवून ठेवण्यासाठी अखंडित वीज पुरवठा चालू ठेवणारे कधी आठवले नाही. घरामध्ये दिवे, पंखे, फ्रिज, AC, TV, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि सर्वात महत्वाचे मोबाईल फोन हे अखंडित चालू होते. जर लाईनस्टाफ बाहेरच पडला नसता तर, वीज खंडित झाली असती तर, किती नागरिक घरात बसले असतें. Work From Home चा फज्जा उडाला असता, डॉक्टर ऑपरेशन करूच शकले नसते, फ्रिज मध्ये रक्त ठेऊ शकले नसते, घरातील सर्व वीज उपकरणे बंद झाली असती. उन्हाळाच्या काळात घरात थांबने मुश्किल झाले असतें, पण या गोष्टीचा अनुभव आला नाही कारण अखंडित सेवा देणे चालू होते. कोणत्या घरात, कोणत्या गल्लीत कोरोना विषाणू आपली वाट पाहतोय याचे भय न बाळगता लाईनस्टाफ आपले काम चोख बजावत होता. त्याचे कुटुंबं घरातच होते पण बाहेर जाऊन तो घरात काय घेऊन येईल याची भीतीही होती तरीही तो जनतेची सेवा देत होता, तर त्याच्या जीवाचे मोल का कमी केले याचे कारण मिळालेच नाही. सर्व संघटना, राजकीय पक्ष यांना विनंती आहे की गेलेल्या माणसाची किंमत भरून निघत नाही किंवा त्याची पोकळी भरून काढता येत नाही. निदान त्याच्या मिळणाऱ्या विमाची रक्कम त्याच्या कुटुंबाला आधार देऊन जाणारी हवी. एकाच ठिकाणी राहणे महावितरण मधील कर्मचारी आणि सफाई कामगार यांचे कोरोना विषाणूने मृत्यू झाला पण सफाई कामगार यांच्या कुटुंबंला 50 लाख मिळतात तर महावितरण मधील कर्मचारीच्या कुटुंबंला 30 लाख. घरातील प्रमुख व्यक्ती जाते आणि त्याच्यात 20 लाखाचा फरक असेल तर खरंच त्या कुटुंबाचे समाधान होईल का ? म्हणून सरकारने पुनःश्च विचार करून सर्वाना एकसारखे 50 लाखाचे विमा कवच द्यावे.अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा