सावित्रीमाई_ फुले

#सावित्रीमाई_पहिली_भारतीय_शिक्षिका झाल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिकवण्याचे काम जोतीरावांनी केले. मात्र त्यांचे पुढील शिक्षण सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि केशव शिवराम जोशी {भावाळकर} यांनी केल्याची नोंद "बॉम्बे गार्डीयन ” या वर्तमानपत्राने २२ नोव्हेंबर १८५१ रोजी केलेली आहे. पुराभिलेखागारातील मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या १८५२-५३ च्या अहवालात जोतीरांनी स्वत:च्या पत्नीला शिक्षिका म्हणून तयार केल्याची नोंद आढळते. भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा,महार -मांग मुलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि पहिले वाचनालय यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे या सरकारी अहवालात म्हटलेले आहे.
अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीबाईंनी शिक्षकेचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती गार्डीयनने दिलेली आहे. "शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षणमार्ग हा! शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा" असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांचा "काव्यफुले" हा १८५४ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे.
"आपल्या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे दुष्ट रोग आहेत.जातीभेदामुळे ज्यांना अनिर्वाय दु:खे भोगावी लागतात त्यांच्यासाठी शिक्षण सुरू करणे हे खरे देशकार्य असल्याने आपण ते सुरू केले." "जे लोक या देशाच्या सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी बायकांना विद्या शिकवली पाहिजे." शाळांमध्ये विनावेतन काम करताना "या पतीपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसद मिळत नसे" असे निरिक्षण वर्तमानपत्रांनी नोंदवले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी देशातील आणि आशिया खंडातील पहिली मागणी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी केली होती. त्या मागणीपत्रात जोतीरावांनी सावित्रीबाईंचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे.
शाळेतील सर्व मुलामुलींना जीवनात पुढे स्वतंत्र आणि स्वावलंबी होता यावे, मजेत जगता यावे यासाठी उद्योगाचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा द्रष्टेपणा त्यांच्याकडे होता."Industrial Departments should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently" आजच्या काळात त्यांचा हा द्रष्टेपणा पाहून थक्क व्हायला होते.निरक्षर पालक हा शिक्षणातला मोठा अडथळा असतो हे ओळखून स्वत:च्या घरात सावित्रीबाईंनी १८५४ साली प्रौढ स्त्रियांसाठी रात्रशाळा सुरू केल्याची माहिती खुद्द जोतीरावांनी दिलेली आहे.
सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी "बालहत्या प्रतिबंधक गृह", सुरु करून त्यात ३५ स्त्रियांची बाळतपणे पोटच्या मुलीच्या मायेने त्यांनी केली. दुष्काळात सुमारे एक हजार मुलांमुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू करून, विधवांच्या केशवपनाविरुद्ध ना.मे.लोखंड्याच्या साथीने केलेला नाभिकांचा संप घडवला. या कामांच्या वेळी जोतीरव फुले हयात होते. सावित्रीबाई त्यांच्या नेत्या होत्या.
जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. स्वत: टिटवे धरले. अग्नी दिला. ओतुर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भुषवले. सहा पुस्तके लिहिली. त्या अर्धशतकभर ज्ञानार्जन, अध्यापन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या. फेब्रुवारी - मार्च १८९७ च्या प्लेगच्या भयंकर साथीत रुग्णांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी औषधोपचार केले. पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुंढव्याच्या महार समाजातील मुलाला पाठीवर घालून त्या हडपसरला ससाणे मळ्यात डॉ .यशवंतच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. त्याला बरे केले. आणि स्वत: याच संसर्गजन्य आजारात १० मार्च १८९७ ला बळी पडल्या.शहीद झाल्या.
स्त्रियांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे द्वारे उघडे करून देणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम ...........

! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule